शुक्रवार, २४ डिसेंबर, २०१०

वडापाव

वडापाव....
-एक महान पदार्थ...
-नवज्योत वेल्हाळ
"बाबा, वडापाव आणायला पैसे द्या ...", माझ्या धाकट्या बहिणीने-मनालीने बाबांकडे वडापावसाठी पैसे मागितले आणि बराच वेळ वर्तमानपत्रात डोकं खुपसून बसलेला मी तिच्याकडे आशाळभुतपणे पाहू लागलो... डोळ्यांसमोर ताजा ताजा लुसलुशीत पाव आणि त्यात लबाडासारखा लपलेला गरमागरम वडा दिसू लागला... ती कधी एकदा वडापाव आणतेय असं झालं मला...पण लगेच दुस-याच क्षणी मनात विचारचक्रही सुरु झालं...
'वडापाव'... असं काय आहे ह्या शब्दात कि तो ऐकताच माझ्या मनाची चलबिचल सुरु होते...? तोंडाला सुटलेल्या पाण्यात जीभ गटांगळ्या खाऊ लागते...? विचार केल्यावर अनेक उत्तरं मिळाली...
'वडापाव'... असा एकमेव पदार्थ जो गेली कित्येक वर्ष महारष्ट्रातल्या प्रत्येकाच्या जीभेवर अधिराज्य गाजवतोय... अगदी प्रत्येकाच्या... मग तो आलिशान बंगल्यात राहणारा एखादा गर्भश्रीमंत असो किंवा गवताच्या झोपडीत राहणारा एखादा गरीब असो... प्रत्येकाला ह्या वडापावने वेड लावलंय...
माझ्या मते तर वडापाव एक महान पदार्थ आहे... कारण तो खाणा-याचंही पोट भरतो आणि खायला घालणा-याचंही... आज मुंबईत अनेक संसार हे वडापावच्या गाड्यांवर उभे अहेत... महारष्ट्रात असं एकही गाव सापडणार नाही कि जिथे वडापाव मिळत नाही... एक वेळ गावात वीज नसेल... पण वडापाव... तो मिळणारच... तहान भागवायला पाणी नसेल, पण भूक भागवायला वडापाव मात्र नक्की मिळेल...
थंडीतुन आणि पावसातुन गरमागरम वडापाव खायची मजा काही औरच...!!! पावसातुन भिजत प्रवास करताना रस्त्याकडेच्या एखाद्या वडापावच्या गाडीवर गरमागरम वडे तळतानाचा वास माझ्या नाकात शिरतो आणि आपोआपच गाडीचा गिअर न्युट्रलवर आणला जातो आणि ब्रेक दाबले जातात... मग लागोपाठ कमीत कमी दोन गरमागरम वडापाव आणि त्यानंतर कडक चहाची कटींग मारल्याशिवाय पाय तिथुन हलतच नाहीत...
वडापावशी जोडलेल्या माझ्या अनेक आठवणीही आहेत... कॉलेजमध्ये असताना मित्र-मैत्रीणींच्या वाढदिवसाला रिचवलेल्या वडापावच्या पार्ट्या..., राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत एखाद्या गावात श्रमदानाला गेल्यावर तिथे गावक-यांकडून मिळणारा वडापावचा नाश्ता... श्रमदान झाल्यावर सर/मॅडम विचारायचे... नाश्त्याला काय खाणार...? आणि सर्वजण एका सुरात ओरडायचे..."वडापाव..!!!"
कधी कधी कॉलेज सुटल्यावर स्टॅंडवर बराच वेळ एस्. टी. ची वाट बघत बसायला लागायचं... अशा वेळी स्टॅंडच्या बाजुच्या वडापावच्या गाडीवर तळल्या जाणा-या वड्यांचा खमंग वास नाकात शिरायचा आणि मझ्या चित्तवृत्ती चाळवल्या जायच्या... दुपारी डबा खाल्लेला असुनसुद्धा गरमागरम वडापाव खायचा मोह मला आवरायचा नाही... मग किमान दोन वडापाव खाल्ल्याशिवाय मन शांत व्हायचं नाही... ह्या आणि अशा अनेक आठवणींत 'वडापाव' आघाडीवर...
आज ह्या महागाईच्या जमान्यात सर्वच खाद्यपदार्थांचे भाव वाढलेत... लहानपणी 'दोन' रुपयांनी आणलेला वडापाव आठवतोय... आज त्याची किंमत कुठे पाच, कुठे सहा, कुठे सात, कुठे आठ, तर कुठे अगदी दहा रुपयांपर्यंत वाढलेली आहे... पण तरीही खवय्यांचं वडापाववरचं प्रेम काही कमी झालेलं नाही... वडापावचे विक्रेतेही आर्थिक झळ सोसून अगदी रास्त दरात माझ्यासारख्या वडापाववेड्या मजनूच्या जिभेचे चोचले अगदी प्रामाणिकपणे पुरवत आलेत...
काळानुसार वडापावमध्ये अनेक बदलही झाले... पुर्वी वडापाव एकाच प्रकारचा मिळायचा, पण आज मात्र मुंबईसारख्या मोठ्या शहरांत वडापावच्रे अनेक प्रकार पहायला-खायला मिळतात... त्यातही जम्बो वडापाव आणि अलिकडेच निघालेला 'शिववडा'पाव विशेष प्रसिद्ध...!!!
वडापावचा शोध कोणी लावला याची नोंद नाही... मात्र तो ज्याने लावला, तो माझ्यासाठी खूपच महान माणूस आहे... त्याला खाद्यक्षेत्रातले जे जे पुरस्कार आहेत, ते ते देऊन त्याचा यथोचित सन्मान केला जावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे... असो...
तर अशा ह्या वडापावशी माझं एक अनामिक असं भावनिक नातं जोडलं गेलं आहे... जगात कुठेही गेलो, तरी वडापाची सर कशालाच येणार नाही... कारण त्यात माझ्या महाराष्ट्राची माया आहे... माझ्या मायभूमीचा गंध आहे... आज वडापाव हा महाराष्ट्राची ओळख बनला आहे...
खरंच! आज ह्या मराठमोळ्या वडापावने प्रत्येक खाद्यरसिकाच्या मनात स्वत:चं असं एक स्वतंत्र स्थान निर्माण केलंय... प्रत्येकाने कृतज्ञ भावनेने आपल्या हृदयात वडापावला अढळपद दिलंय... गेली कित्येक वर्ष गरीबांचा हा बर्गर खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवत आलाय आणि ह्यापुढेही पुरवत राहील...
अशा ह्या एकमेवाद्वितीय, गरीबांच्या बर्गरला-वडापावला माझा सलाम...!!!!
चला... खमंग वास येतोय... मनालीने वडापाव आणला वाटतं... मी निघालो........
*_*_*_*_*_*_*_*_*_*_*_*_*_*_*_*_*_*_*_*_*_*__*_*_*_*_*_*_*_*_*_*_*_*_*_*_
-नवज्योत वेल्हाळ (९४२१४३८००७,८०९७१६८३२०)
navjyotvelhal2009@gmail.com